MLC : तुकाराम मुंढेंना विरोध करणे भाजप उमेदवाराला पडले महागात; नागपूरकरांची सोशल मीडियावर टीकेची झोड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हा भाजपचा गड समजला जातो. पण पदवीधर निवडणुकीत या गडाला सुरुंग लागला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाची रचना झाल्यापासून जनसंघ आणि नंतर भाजपने हा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या आपल्याकडे कायम राखला होता. परंतु काँग्रेसने यंदा तो प्रथमच जिंकला आहे. नागपूर या गडातच भाजपचा 18 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. नागपूरमध्ये माजी आमदार अनिल सोले यांच्याऐवजी संदीप जोशी यांना उमेदवार मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. पण जोशींना भाजपचा बालेकिल्ला राखता आला नाही.

नागपूर पदवीधर निवडणुकीतील भाजपच्या दारुण पराभवाची कारणमिंमासा आता सुरू आहे. सोशल मीडियावर नागपूरकर तर्कवितर्क लढवत आहेत. यामध्ये बरेच जण संदीप जोशी यांना पराभवाचे कारण मानत आहेत. महापालिकेत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना जोशींनी जो त्रास दिला, त्याचे परिणाम त्यांनी या निवडणुकीत भोगले, असा सूर नागपूरकरांनी सोशल मीडियावर लगावला आहे. मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना अगदी पहिल्या दिवसापासून महापौर-आयुक्त वाद सुरू झाला होता. तुकाराम मुंढे यांना अडचणीत पकडण्याची एकही संधी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सोडली नव्हती, असाही आरोप नेटकऱ्यांनी केला होता. एका नागपूरकराने म्हटले आहे की, नागपूरमध्ये तुकाराम मुंढे सोबत पंगा घेणं महागात पडले, तर एकाने काही नाही हो तुकाराम मुंढे यांना नागपुरातून काढल्यामुळे नागपूरकरांनी दिलेला एक धक्का असल्याचे म्हटले आहे.

… वर्षपूर्तीनंतर पहिल्याच निवडणुकीत भाजपचा धुव्वा
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनंतर नागरिकांतून झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाला. विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. नागपूर आणि पुणे या आपल्या पारंपरिक पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांनी मतदार नोंदणीपासून प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली होती. त्याचा त्यांना फायदा झाला. भाजपमध्ये शेवटपर्यंत उमेदवारीचा घोळ घातला गेला. पदवीधरांनी प्रथमच नागपूरमध्ये भाजपला नाकारले.