संतापजनक ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात ‘कोरोना’ग्रस्ताच्या मुलीला आणि मुलालाही शाळेत प्रवेश नाकारला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपुरात पाच दिवसापूर्वी अमेरिकेहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर आज सकाळी त्या व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. त्यासोबत त्या व्यक्तीच्या मुलालाही कॉलेजात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

अमेरिकेहून माघार आलेल्या व्यक्तीला कोरोना असल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाले. त्यानंतर त्या व्यक्तींला सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. आज त्या व्यक्तीची मुलगी शाळेत गेली तेव्हा तिला प्रवेश देण्यात आला नाही. यावेळी पालकांनी शाळेला विनवणी सुरू केली. मात्र शाळा नकार देत राहिली. नंतर पालक आक्रमक झाल्याने अखेर संबंधित मुलीच्या वडिलांना कोरोना झाल्याचे शाळा प्रशासनाला स्पष्ट करावे लागले. त्यानंतर सर्व पालक हे शांत झाले. त्यासोबत मुलालाही कॉलेजात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

ही व्यक्ती पाच दिवसांपूर्वी अमेरिकेतून आली होती. अमेरिकेतून आल्यानंतर ही व्यक्ती नागपुरात कोणाच्या संपर्कात आली याचा शोध आता घेण्यात येत आहे. नागपुरातील ११ संशयित रुग्णांपैकी ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरित दोघांचे अहवाल बुधवारी रात्री ८ च्या सुमारास प्राप्त झाले असता त्यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. प्रशासनाकडून नागपूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत.