नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

नागपूर: रिंगरोडवरील शताब्दी चौकात वाहतूक पोलिसाला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. गोंदियातील डुग्गीपार येथे या चालकाला पोलिसांनी पकडले. तो कुख्यात गुंड असल्याचे समोर आले. संदेश भोयर (वय ३८, रा.शताब्दीनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर चोरी, घरफोडी,विनयभंगासह दोन डझन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.

रिंगरोडवरील शताब्दी चौकात शनिवारी सकाळी वाहतूक पोलिस नितीन वरठी हे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना ओमकारनगर चौकाकडून शताब्दीनगर चौकाकडे पांढऱ्या रंगाची कार (क्रमांक नसलेली) वेगात येताना दिसली. सिग्नल तोडल्याने चालकाला कार थाबवण्याचा इशारा वरठी यांनी केला. मात्र चालकाने कारचा वेग वाढवून थेट वरठी यांना धडक दिली. यामध्ये वरठी जखमी झाले. तर घटनास्थळावरुन कर घेऊन चालक फरार झाला. वरठी यांच्यावर उपचार सुरु असून अजनी पोलिसात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकारची पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेत कारचालकाला शोधून काढण्याचे आदेश दिले. पोलिस उपायुक्त डॉ.अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अजनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित कार चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी, कोणतीही माहिती हाती लागली नाही, तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शताब्दीनगर चौकातील एका गल्लीतून तो आल्याचे पोलिसांना या फुटेजमध्ये दिसले. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत त्या दिशेने तपास सुरु केला. त्यावेळी तो कार चालक दुसरा तिसरा कोणी नसून कुख्यात गुंड संदेश असल्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला त्याच्या मोबाइलला लोकोशनवरून शोधून गजाआड केले.