Nagpur : अंधश्रध्देचा कळसच ! म्हणे, नागीन डान्स करून कोरोना रूग्णांवर उपचार, भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला पण भक्त तर भक्तच ना?, जाणून घ्या प्रकरण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोना दूर करण्याचा दावा करून लोकांना लुटणा-या भोंदूबाबाचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आपल्या अंगात चक्क नागराज अवतरतात अशी ताप मारून तो लोकांना मूर्ख बनवत होता. पोलिसांनी त्याला जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुरुवारी (दि.13) अटक केली आहे. दरम्यान भोंदू बाबाला अटक केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री भक्तांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. बाबाला सोडण्याची मागणी करत पोलिसांविरोधात घोषणाबाजी यावेळी जमावाने केली. मात्र, तुमच्या समस्या अंतर्ज्ञानाने कळणाऱ्या बाबाला स्वत:वरील कारवाईबाबत का कळले नाही, असे जेंव्हा समजावून सांगितले त्यावेळी लोकांनी काढता पाय घेतला.

शुभम तायडे (रा. पंचशीलनगर) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी अंनिसने शुभम तायडे या गुणवंत बाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अंनिसचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी सापळा रचून बाबाच्या दुष्कृत्याचा भंडाफोड केला. बाबा दैवी शक्तीने पैशाचा पाऊस पाडतो, सट्ट्याचा नंबर देतो, गुप्तधन शोधतो, आजार दूर करतो, भक्तांच्या घरातील भानगडी दूर करतो व स्वप्नात येऊन समस्यांचे निवारण करतो, असा दावा बाबाचे भक्त करत होते. दरम्यान बाबाने गुरुवारी पंचशीलनगर येथील स्वत:च्या घरी दरबार थाटत होता. गुरुवारी (दि. 13) रात्री सापळा रचत पोलिसांनी रात्री 9 वाजता बाबाच्या दरबारात धाड टाकली. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतानाही येथे 50 पेक्षा जास्त भक्तांनी गर्दी केली होती. यावेळी बाबाच्या अंगात शेषनाग संचारल्याने तो जमिनीवर सापासारखा आळोखेपिळोखे देत फुसफुस करत होता. मात्र, पोलीसांना पाहताच त्याचे फुसफुसणे बंद झाले. बाबा कोरोना संक्रमित रुग्णांना क्षणार्धात कोरोनामुक्त करतो, असे भक्त यावेळी सांगत होते. अशाच तऱ्हेने बाबा लोकांना स्वत:मध्ये दैवी शक्ती असल्याचे सांगून भीती दाखवत होता. मात्र, पोलिसांच्या अचानक झालेल्या उपस्थितीने त्याचा दैवी चमत्कार दूर पळून गेला. यावेळी पोलिसांनी बाबाला जादूटोणाविरोधी कायदा, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी प्रथानुसार अटक केली आहे.