Coronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’बद्दल फेक ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल करणार्‍यांना अटक (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाबत अनेक अफवा सोशल मीडियातून व्हायरल करण्यात येत आहेत. अशातच नागपूरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येबाबत एक फेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्या तिघांना सायबर सेलच्या पोलिसांनी अटक केली आहे. जय गुप्ता, अमित पारधी आणि दिव्यांशू मिश्रा अशी या आरोपींची नावे आहेत.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या 130 वर पोहचली आहे तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा फायदा घेत समाजकंठकांकडून अफवा पसरवण्याचे काम केले जात आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलकडून नजर ठेवण्याच येत आहे.

नागपूरमध्ये अशाच प्रकारे कोरोनाग्रस्तांचा चुकीचा आकडा व्हायरल करणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या तिघांनी मिळून एक फेक व्हिडिओ तयार केला. यामध्ये गुप्ता आणि पारधी या दोघांच संभाषण असून त्यात ते नागपूरमध्ये 59 रुग्ण सापडल्याचा दावा करत आहेत. दिव्यांशू मिश्रा याने हा व्हिडिओ त्याच्या पत्नीला पाठवला त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला, अशी माहिती आहे.

सायबर सेलनं तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान हे प्रकरण उघडकीस आणलं. सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेलं हे पहिलंच प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी दिली.