Anil Deshmukh : ‘कोरोना’च्या रूग्णांची लूट थांबणार ? गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गित रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारणे, सरकारी नियमांनुसार तपासणीचे पैसे न घेता अतिरिक्त शुक्ल आकारणी करणे, अशा तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यासाठी ‘स्टिंग ऑपरेशन’ (Sting operation) केले जाईल. तसेच खासगी रुग्णालय, खासगी कोरोना तपासणी लॅब आणि खासगी प्लाझ्मा लॅबवर आकस्मिक भेट देत गुप्त मोहीम राबवून करडी नजर ठेवली जाईल. सामान्य नागरिकांची लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ ही मोहीम घेऊन महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागपुरातील कोरोना मृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात येत असताना, काही खासगी रुग्णालये सरकारी निर्देशानुसार काम करत आहेत. मात्र, काही खासगी रुग्णालये, तपासणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा प्रयोगशाळांमध्ये रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी आणि पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने सरकारी निर्देशांची पायमल्ली करुन जास्तीचे पैसे मागणाऱ्यां वैद्यकीय आस्थापनांना मोकळीक दिली जाणार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

आजपासून ‘स्टिंग ऑपरेशन’

नागपूर (Nagpur ) शहरातील खासगी रुग्णालये, लॅब आणि प्रयोगशाळांना आकस्मिक व गुप्त भेटी देणारे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे वेगवगेळे चमू तयार केले आहेत. सोमवारपासून ही कारवाई सुरु होईल, असे देशमुख यांनी म्हटले. तसेच त्यासाठी पोलीस विभागाचा टोल फ्री क्रमांक १०० आणि व्हाट्स ॲप क्रमांक ९८२३३००१०० प्रसिद्ध केला आहे. सामान्य नागरिक दोन्ही क्रमांकावर आपल्या अडचणीची तक्रार नोंदवू शकणार आहेत. त्यानंतर संबंधित आस्थापनाला त्याबाबत जाब विचारला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

होम क्वारंटाईन व्यक्ती बाहेर पडल्यास दंड

शहरात कोरोना रुग्णसंख्येबरोबर मृत्युदर देखील वाढत आहेत. त्याच दरम्यान काही बेजबाबदार नागरिक विलगीकरणात असताना सुद्धा बाहेर फिरत असून, ते स्वतःसोबत, स्वतःच्या कुटुंबीयांचा आणि समाजातील नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यासाठी यापुढे गृह विलगीकरणात असलेल्या बाधित नागरिकांना हातावर शिक्का मारण्याच्या सूचना दिल्या आहेत. काम नसताना नागरिकांनी बाहेर पडू नये, मास्कचा वापर करा. नाही केल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. सोमवारपासून अधिक सक्तीने ही मोहीम राबवण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थिती मध्ये नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना मृत्यूदर कमी करायचा आहे. त्यासाठी नागरिकांनी आणखी चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.