‘आगामी काळात वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन करणार’ : प्रकाश आंबेडकर

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी काळात वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. मागील ७० वर्षांपासून सत्तेपासून उपेक्षित असलेल्या अन्यायग्रस्त समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व वंचित बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. एका मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

चिमूर येथील बी.पी.एड.कॉलेज मैदानात आयोजित धनगर,माना, गोवारी,हलबा, ढिवर समाजाच्या मार्गदर्शन मेळाव्यात उपस्थिताना ते संबोधित करीत होते. यावेळी बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले की, ” भाजप सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून सत्तेत येण्याच्या प्रयत्न करीत असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रयत्न हाणून पाडा.” असे आवाहन त्यांनी केले.

याशिवाय पुढे बोलताना ते म्हणाले की, “विद्यमान सरकार शेतकऱ्यांना डावलून बड्या उद्योजकांना पाठीशी घालण्याचा खटाटोप भाजप सरकार करीत असून लघु उद्योजकांचे उद्योग डबघाईस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.” असा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केली.

यावेळी धनगर समाजाचे नेते आमदार हरिभाऊ भदे, माना समाजाचे नेते माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, मच्छीमार संघर्ष समितीचे संयोजक न्या.चंद्रलाल मेश्राम, आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत, धनराज वंजारी, मार्गदर्शन मेळाव्याचे संयोजक अरविंद सांदेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव श्रीरामे, संचालन प्रा. चौधरी तर आभार प्रकाश मेश्राम यांनी मानले.