लग्नाच्या एक दिवस आधीच पतंगाच्या मांजाने कापला युवकाचा गळा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षी पतंगाच्या मांजामुळे अनेक अपघात समोर येतात. काहीवेळेस यात अनेकांचा बळीही जातो. अशीच एक घटना समोर आली आहे. बोहल्यावर चढण्याच्या एक दिवस आधीच एका युवकाचा नायलाॅन मांजाने गळा कापला गेल्याची घटना घडली आहे.  विकास गायकवाड (वय २६, रा. कामगार कॉलनी, हिंगणा मार्ग) असे या युवकाचे आहे. बुद्ध विहारात वंदना करण्यासाठी जाताना ही घटना घडली. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी अवस्थेतच तो बोहल्यावर चढणार होता असेही समजत आहे.

विकास या घटनेतून थोडक्यात बचावला आहे नाहीतर उगाच मोठा अपघात घडला असता. विकास हा जीपीओमध्ये कंत्राटी तत्त्वावर नोकरीला आहे. मंगळवारी हळदीच्या कार्यक्रमापूर्वी सकाळी विकास हा बुद्ध विहारात बौद्धवंदनेसाठी गेला. कामगार कॉलनी मैदानात काही मुले पतंग उडवित होती. विहारकडे जाताना विकासचा गळा नायलॉन मांजाने कापला. तो यात चांगलाच जखमी झाला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. विकास पायी जात असल्याने थोडक्यात बचावला. वाहनावर असता तर अनर्थ झाला असा, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. विकासचे हिंगणा परिसरातील लता मंगेशकर हॉस्पिटल कर्मचारी कॉलनीत राहणाऱ्या मुलीसोबत लग्न ठरले आहे असे समजत आहे.

नायलाॅन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु अद्यापही त्याचा सर्रास वापर होताना दिसत आहे. अनेकांच्या बेफिकरीचा परिणाम दुसऱ्यांच्या आयुष्यावर होतो. नायलाॅन बंदीला फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाही असे या घटनेतून समोर आले आहे.