धक्कादायक ! 350 किलोमीटरच्या पायपीटीनंतर मजुराची आत्महत्या

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकाडाऊनमुळे अनेक जिल्ह्यातील, राज्यातील मजूर देशाच्या विविध भागात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने आणि होणारी उपासमार यामुळे मजुरांनी आपल्या घराचा रस्ता धरला आहे. घराकडे जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने मजुरांनी पायी किंवा इतर साधनांचा मदतीने घराकडे जाण्याचा पर्याय शोधला आहे. पायपीट करून घराकडे निघालेल्या काही मजुरांच्या जीवावर ही पायपीट बेतली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील एका मजुराचा समावेश आहे.

हैदराबाद येथून पायी निघालेल्या गोंदिया येथील बांधकाम मजुराच्या वाट्याला या प्रवासाने आत्महत्या दिली. हैदराबाद ते गिरड असा 350 किलोमीटरचा पायी प्रवास करून देखील हताश आणि निराश झालेल्या या मजुराची पायपीट अखेर गळफासाने संपुष्टात आली. गोंदिया यथील अमरसिंह मडावी (वय -40) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. अमरसिंह हा हैदराबाद येथे एका बांधकाम साईटवर काम करत होता. लॉकडाऊनमुळे काम थांबल्याने त्याच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. काम सुरु होईल या आशेने वाट पाहिली पण काम सुरु होण्याची शक्यता धुसर झाल्याने त्याने घराचा रस्ता धरला.

घराकडे जाण्यासाठी कोणतीही वाहन व्यवस्था नसल्याने त्याने पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या सोबत आणखी एका मजुराने पायी घराकडे जाण्याचे ठरवले. दोघांनी पायी प्रवास सुरु करून वाट तुडवत 350 किलोमीटर चालत वर्ध्यातील गिरड गाठले. गिरडच्या आधी वाटेत त्यांना एका ट्रक चालनाने ट्रकमध्ये बसवले. यावेळी ट्रकमध्ये आणखी काही मजूर होते. दरम्यान, ट्रक नाश्त्यासाठी वाटेत थांबला. अमरसिंह देखील लघुशंकेसाठी खाली उतरला असता ट्रकचालकाच्या लक्षात न आल्याने त्याने अमरसिंहला तेथेच सोडून निघून गेला. अनोळखी जागा आणि एकटाच असल्याने तो निराश झाला. यातूनच त्याने जवळ असलेल्या एका कटुलिंबाच्या झाडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

अशी पटली ओळख
पोलिसांनी त्याच्या खिशातील मोबाईल चार्ज करून कुटुंबाशी संपर्क साधला. त्याचा पत्ता शोधून काढला. त्यावेळी झाडाला गळफास घेतलेला व्यक्ती गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिल्लारी गावचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो दीड महिन्यापूर्वी हैदराबाद येथे बांधकाम साईटवर काम करण्यासाठी गेला होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्याच्या हातचे काम गेल्याने तो निराश झाला होता. उपासमार, बेकारी आणि निराशा यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like