अकरा नक्षलींचे मृतदेह नदीत सापडले

नागपूर: वृत्तसंस्था
गडचिरोलीमध्ये दोन दिवसात नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई झाली. या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत आतापर्यंत 33 नक्षलवादी ठार झाले आहेत. गडचिरोलीच्या इंद्रावती नदीत सोमवारी अकरा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या यशस्वी कारवाई नंतर भारतीय जवानांनी लोकप्रिय गायिका सपना चौधरीच्या गाण्यावर ठेका धरता यश साजरे केले.

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवार आणि सोमवारी प्रचंड चकमकी झाल्या. पहिल्या कारवाईत सुरक्षा दलाने १६ नक्षलवाद्यांना ठार केले. दुसऱ्या कारवाईत सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले. हे नक्षलवादी आमदार पांडूरंग वरोरा, वैभव पिचड, आनंद ठाकूर, शांताराम मोरे आणि अमित घोडा या आमदारांना मारण्यासाठी आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

शोधकार्यात सापडले नदीत मृतदेह
यानंतर मात्र गडचिरोलीच्या जंगलात ‘शोध कार्य’ सुरू असताना इंद्रावती नदीत अकरा नक्षलवाद्यांचे मृतदेह वाहताना दिसले. दोन दिवसाच्या कारवाईत २२ नाही तर 33 नक्षलवादी मारले गेल्याचे लक्षात आले. ही कारवाई जिमालगट्टा परिसरातील राजाराम खांदला जंगलात झाली. कारवाईत ‘सी-६- कमांडो’नी देखील उल्लेखनीय कामगिरी बजावली. आतापर्यंत 33 नक्षलवाद्यांपैकी ११ जणांची ओळख पटली आहे.

जवानांच्या यशाचे सेलिब्रेशन
ही कारवाई म्हणजे दोन दशकातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते. या यशानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सपना चौधरीच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ आणि ‘सैराट’ चित्रपटातील गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

संबंधित घडामोडी:
गडचिरोलीत पोलिसांची धाडसी कामगिरी ; पुन्हा सहा नक्षलींना कंठस्नान
पोलीस नक्षल चकमकीत १६ नक्षली ठार
गडचिरोलीत पोलिसांनी १४ माओवाद्यांना घातले कंठस्नान