IAS अधिकारी तुकाराम मुंढेंच्या नावाने फेक पोस्ट करणारे 2 जण अटकेत

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाने चुकीचा संदेश नागरिकांमध्ये पोहचवणाऱ्या दोघांच्या नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नगा नदी स्वच्छ झाली आहे. आता या नदीचे पाणी पिण्यायोग्य झाले आहे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, अशा आशयाची चुकीचा संदेश समाज माध्यमांवर व्हायरल केला होता. या दोघांना गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अटक केली आहे. आदित्य मुकेश तराळे (वय-20 रा. बोरिकर ले-आऊट) आणि राहुल बुद्धरत्न ताकसांडे (वय-21 रा. नाईकनगर, मानेवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महापालिकेने नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. याचाच फायदा घेत दोघांनी एलआयटी मेम्स नागपूर या नावाने फेसबुक पेज व ट्विटर अकाऊंट उघडले. दोघांनी महापालिकेचा लोगो वापरून नागपूर शहरातील नाग नदीचे प्रदूषण कमी झाले आहे. सांडपाण्याच्या कमतरतेमुळे नाग नदीचे पाणी पिण्यायोग्य झाले असून, ते उद्यापासून नागपूर शहराला पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, महापालिका आयुक्त मुंढे, असा संदेश फेसबुक व ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला.

दरम्यान, 23 एप्रिल रोजी ही पोस्ट व्हायरल झाली. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार करण्याचे निर्देश प्रशासनातील अधिकाऱ्याला दिले. त्यानुसर जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी सदर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सायबर सेलचे सहाय्यक निरीक्षक विशाल माने, विलास मोटे, हेड कॉन्स्टेबल विनोद तिवारी व त्यांच्या सहकार्यांनी केली.