‘झुंड’ नहीं टीम कहिए..’ ; ‘बिग बी’ अमिताभ – नागराज मंजुळेंचा दमदार टीझर प्रदर्शित (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वादामुळे अनेक दिवस रखडलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर काही वेळापुर्वीच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्या भारदस्त आवाजात या टिझरची सुरुवात होते. ‘झुंड नहीं कहिए.. टीम कहिए सर..’ हा संवाद ऐकायला मिळतो आणि काही मुलांची टीम हातांमध्ये विविध शस्त्र घेऊन जात असते. 1 मिनिट 12 सेकंदाच्या या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण केली आहे.

नागराज मंजुळे या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाला अजय-अतुल या जोडीने संगीत दिले आहे. त्यांच्या दमदार संगीताची झलक या टीझरमध्ये पहायला मिळत आहे.

‘झुंड’ हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. याच कथेवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट 8 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या निर्मात्या सविता हिरेमथ यांनी या दोन दिग्गज कलाकारांना एकत्र आणले आहे. ‘खोसला का घोसला’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. त्यांनी एका मुलाखतीमध्ये हे दोन कलाकार कसे एकत्र आले हे सांगितले. त्या स्वतः नागराज मंजुळे यांना भेटण्यासाठी पुण्याला गेल्या होत्या. मंजुळे यांच्याशी बोलताना त्यांना कळाले की ते बिग बी यांचे मोठे चाहते आहे. हिरेमथ यांनी नागराज मंजुळेंना सांगितले की, ‘तुमचा होकार असेल तर मी अमिताभ बच्चन यांच्याकडे चित्रपटाचा प्रस्ताव मांडू शकते.’ त्यांच्या होकारानंतर हिरेमथ यांनी बिग बी यांच्याकडे प्रस्ताव मांडला. नंतर अमिताभ बच्चन यांनी ‘सैराट’ चित्रपट बघितला व या चित्रपटासाठी होकार दिला.

फेसबुक पेज लाईक करा –