तत्कालीन नायब तहसिलदार गितांजली गरड यांच्यानंतर ‘त्या’ शासकीय जमिनीच्या हायप्रोफाईल अपहार प्रकरणात एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोट्यवधी रुपयांच्या शासकिय जमीनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण करत फसवणूक केल्या प्रकरणात तत्कालीन मंडल अधिकारी बळीराम खंडुजी कड याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी तत्कालीन नायब तहसिलदार गितांजली नामदेवराव गरड यांना समर्थ पोलिसांनी अटक केली होती. बळीराम कड याने अटकपूर्व जामीन मिळवा यासाठी पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र कड याचा अटकपूर्व जामीन नाकारला होता. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

काय आहे प्रकरण

जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याच्या कार्यालयातील लिपीक चंद्रशेखर ढवळे बनावट आदेश तयार केले. ते आदेश बनावट असल्याचे माहित असूनही ते खरे आहेत असे भासविण्यात आले. त्यानंतर सुभाष कारभारी नळकांडे (बुरुंजवाडी, ता. शिरुर) याने त्याचा वापर केला व त्या आदेशावरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या नावे शिरुर तहसील कार्यालयातील पुनर्वसन लिपीक रमेश वाल्मिकी याने खोटे अर्ज तयार केले. त्यावर कारवाईचे अधिकार नसताना तहसिलदार यांच्या अपरोक्ष तत्कालीन नायब तहसीलदार गरड यांनी त्यांचे शेरे घेतले. त्या नोंदी तत्कालीन मंडल अधिकारी बळीराम खंडूजी कड याने ते न तपासता प्रमाणित केले. त्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा खोटा अर्ज तयार करून त्यांनी शासन प्रदान जमीनींचा भोगवटा वर्ग बदलण्यासाठीचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा वरिष्ठांना असताना ते शिरूर तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले. त्यावर गरड यांनी शेरे मारले. त्याआधारे शासकिय जमीनीचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या नावे झालेल्या जमीनींचे भोगवटा वर्ग बदलाचे गावकामगार तलाठी कासारी काळे याने फेरफार रजिस्टरी नोंद केले.

त्या नोंदी तत्कालीन मंडल अधिकारी कड याने कोणत्याचाही बाबींची पडताळणी न करता त्याकडे हेतूत: दूर्लक्ष केले. त्यामुळे शासकिय जमीनींचे हस्तांतरण झाल्यानंतर त्यांचा भोगवटा वर्ग बदलला गेल्याने त्या जमीनींच्या विक्रीचे असलेले शासकिय निर्बंध बनावट आदेशाच्या आधारे डावलले गेले. त्यामुळे अशा जमीनी पुन्हा सर्वसामान्यांना विकल्या गेल्या. त्यामुळे शासनाची व सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत तपासात अशी अनेक प्रकरणे समोर आली असून ६० एकरपेक्षा अधिक शासकिय जमीनीचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण झाले आहे. या जमीनींची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

गुन्ह्याचा तपास परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –