संतापजनक ! नालासोपार्‍यात महिलेवर 4 वेळा बलात्कार, डिलिव्हरी बॉयनं केला अत्याचार

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – एका घरकाम करणाऱ्या महिलेवर त्रिकुटाने नोकरी देण्याच्या नावाखाली चार वेळा सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीसांनी तिघांना अटक केली आहे.

अमित तिवारी (वय 23), पवन द्विवेदी (वय 21), धीरज पाल (वय 21) अशी अटक केलेल्या नराधम आरोपीची नावे आहेत. या प्रकरणी पिडीत महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 37 वर्षीय महिला विरार येथील ग्लोबल सिटी परिसरात एका घरात घरकाम करते. येथे अ‍ॅमेझोन वरून मागविलेल्या सामानाची डिलिव्हरी करणारा एक युवक सातत्याने येत असल्याने त्याच्या बरोबर तिची ओळख झाली. ओळखीतून या युवकाने महिलेला दुसरीकडे चांगले काम मिळवून देतो सांगून, तिला दुचाकीवरून हनुमान नगर परिसरातील एका इमारतीत नेले. तिथे त्याचा आणखी एका मित्र आधीच हजर होता. दोघांनी तिच्यावर अत्याचार करत तिची चित्रफित तयार केली आणि त्या आधारे तिला धमकावून तिच्यावर चार वेळा सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिसऱ्या एका मित्राला त्यांनी तिचा मोबाईल क्रमांक देवून त्याने सुद्धा तिला धमकावून संबध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पिडीत महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लबदे यांनी दिली.