नालासोपाऱ्यात ‘त्या’ कोरोना रुग्णांचा मृत्यू नसून हत्या, भाजपकडून राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि साधनसामुग्रीवर याचा परिणाम होताना दिसत आहे. नालासोपाऱ्यामध्ये सोमवारी (दि.12) दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारी आणि तुटवड्यावरुन आणि रुग्णांच्या मृत्यूवरुन विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी नालासोपाऱ्यात घडलेल्या प्रकाराला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप सोमस्या यांनी केला आहे. तसेच रुग्णालयात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नसून हत्या झाली असल्याचा आरोप करुन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हटले की, मुंबईच्या जवळ असलेल्या नालासोपाऱा येथील विनायक हॉस्पिटलमध्ये सोमवारी एकाच दिवशी 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण हे मृत्यू हॉस्पिटलमधील ऑक्सिजन यंत्रणेतील त्रुटीमुळे झाले आहेत. त्यामुळे हे मृत्यू नसून ठाकरे सरकारने केलेली हत्या आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, विनायक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पालघर पोलिसांनी फेटाळून लावले आहे. अशा प्रकारची अफवा पसरवली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याची अफवा परिसरात पसरली. यामुळे हॉस्पिटल बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे हॉस्पिटलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर संबंधित रुग्णांचे मृत्यू हे त्यांचे वय अधिक असल्याने आणि त्यांना इतर व्याधी होत्या. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.