नमाज सुरु झाली अन् राजेंनी भाषण रोखलं

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, आयोजित सभेमध्ये राजेंचं भाषण सुरू झालं अन् त्याचवेळी दुपारचा नमाज सुरु झाला. जोहारचं नमाज सुरु झाल्याने उदयनराजेंनी आपल भाषण रोखलं.

दरम्यान, सभेतील काही उत्साही कार्यकर्ते शिट्ट्या वाजवत होते, तसेच हसत होते, त्यांना हसू नका, शिट्या वाजवायला काय झाले, असं म्हणत त्यांना चांगलचं फैलावर घेत झापलं.

आज उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी साताऱ्यात मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

यावेळी सभेदरम्यान राजेंनी आपल्या स्टाईलमध्ये जोरदार भाषण केलं. ‘मैं बोलता हू ओ मैं करता हूँ और जो नही बोलता हूँ ओ मैं डेफिनेटली करता हूं,’ असं म्हणत डायलॉगबाजी देखिल केली.

यावेळी त्यांनी मोदी सरकारवार हल्लाबोल करतांना, पाच वर्षपूर्वी ज्यांना बहुमत दिले, त्यांनी मात्र जनतेची दिशाभूल केली. मन की बात करून फक्त अभिनय केला. त्यातून पदरात काहीच पडले नाही. तळागाळातील जनतेला नुसती आश्वासनं दिली, त्यातून जनता आणखी तळागाळात गेली. १५ लाख तर मिळालेच नाहीत त्यातून नोटाबंदी करून पैसा काढून घेतला अशी टिका रोजेंनी यावेळी केली.