‘त्या’ प्रकरणाबाबत पोलिस महासंचालकांची कबुली, म्हणाले, ‘त्यांची नावे नजरचुकीने यादीत आली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याबाबत हुतात्मा आयपीएस अधिकारी अशोक कामटे यांच्यासह दिवंगत अधिकारी हिमांशू रॉय, आर.के साहाय यांच्याकडून मालमत्तेबात माहिती मागवण्याचा प्रकार घडला होता. आता त्याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैसवाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा सर्व प्रकार नजरचुकीने घडला असल्याचे त्यांनी संगितले आहे. त्यासोबतच त्यांची नावे देखील तातडीने यादीतून हटवण्यात आली असून संबंधितांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा हेतू नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना जैसवाल म्हणाले की, शहीद अशोक कामटे आणि दिवंगत अधिकाऱ्यांबद्दल आपल्या सर्वांना नितांत आदर आहे. त्यांच्या कुटुंबियांना दुखवण्याचा कोणत्याही प्रकारचा हेतू नाही. ही नावे नजर चुकीने यादीत आली आहेत. ती तातडीने हटवण्यात आली असून यादी अद्यावत करून त्याबाबत केंद्रीय गृहविभागाकडे माहिती पाठवली जाईल.

काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या ज्या आयपीएस अधिकाऱ्यांनी २०१८ या वर्षात त्यांच्याकडील मालमत्तेबाबतची माहिती कळवली नव्हती त्यांना ताबडतोब माहिती कळवण्याच्या सूचना केंद्रीय गृहविभागाकडून करण्यात आल्या होत्या. याकरिता एक यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत २६/११ हल्ल्यातील शहीद तसेच अन्य मृत अधिकाऱ्याच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. माध्यमांकडून ही माहिती उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर लगेचच महासंचालक कार्यालयाने संबंधित यादीच संकेतस्थळावरून काढून टाकली होती. तसेच अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे या यादीत शहीद अशोक कामटे , दिवंगत सर्वश्री आर.के. सहाय , हिमांशू रॉय , आनंद मंड्या, तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले व्ही. एस. लक्ष्मीनारायण, बडतर्फ मारिया फर्नांडिस, निवृत्त अप्पर महासंचालक भगवंत मोरे यांचा समावेश होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like