‘गलवान’ खोर्‍यातील शहिदांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरणार !

पोलिसनामा ऑनलाईन – पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यात चिनी फौजांशी शौर्याने लढताना शहीद झालेल्या 20 भारतीय जवानांची नावे राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार आहेत. त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे शहीदांच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

भारत व चीन यांच्या फौजांमध्ये 15 जूनच्या रात्री पाच दशकांतील सर्वात भीषण संघर्ष झाला होता. चीनतर्फे गलवान खोर्‍यातील पेट्रोलिंग पॉइंट 14 च्या परिसरात टेहळणी चौकीच्या उभारणीला भारतीय सैनिकांनी विरोध केल्यामुळे चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठया, लोखंडी कांबी वापरून त्यांच्यावर भीषण हल्ले केला होता. यात शहीद झालेल्या लष्करी जवानांमध्ये 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बी. संतोष बाबू यांचा समावेश होता. या घटनेमुळे पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव मोठया प्रमाणात वाढला. भारताने याचे वर्णन ‘चीनची पूर्वनियोजित कृती’ असे केले होते. त्यानंतर आता गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या जवानांचा सन्मार करण्यासाठी त्यांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.