आश्चर्य ! मृत्यू पावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभागाकडून ‘नोटीस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या गृह विभागाने 14 पोलीस अधिकाऱ्यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे ज्यांना आपली संपत्ती जाहीर करायची आहे अशा अधिकाऱ्यांमध्ये शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि आत्महत्या केलेले पोलीस अधिकारी हिमांशु रॉय यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यादीमध्ये काही निवृत्त अधिकारी तसेच काहींना पदावरून हटवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गृह विभागाने गेल्या ऑक्टोबरमध्ये एकूण 14 आयपीएस अधिकाऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवली होती. यादीत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपले वार्षिक उत्पन्न जाहीर केले नाही, असे विभागाने राज्य सरकारला कळवले आहे. आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारकडे आपली वार्षिक संपत्ती घोषित करावी लागते. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी संपत्ती घोषीत करायची आहे, अशा अधिकाऱ्यांमध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशु रॉय यांचा समावेश करण्यात आला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशु रॉय यांनी मे 2018 मध्ये आत्महत्या केली होती. तर या यादीत माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर.के. सहाय यांच्याही नावाचा समावेश आहे. सहाय यांचा 2013 मध्ये जळून मृत्यू झाला होता. तसेच या यादीत 2018 मध्ये निवृत्त झाल्यानंतर 15 दिवसांत मृत्यू झालेले पोलीस उपायुक्त आनंद मांड्या यांचेही नाव आहे.

निवृत्त झालेले अधिकारी
निवृत्त आयपीएस अधिकारी भगवंतराव मोरे आणि 2018 मध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेले आणि नोकरी गमावलेले आयपीएस अधिकारी विजय कृष्ण यादव, 12 वर्षापर्यंत ड्युटीवरून बेपत्ता राहिलेले आणि 2017 मध्ये निवृत्त झाल्याचे मानल्या गेलेल्या 1991 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी मॅरी लुई फर्नांडीस यांचाही यादीत समावेश आहे. 2018 मध्ये नोकरी सोडून राजकारणात आलेले व्ही.व्ही. लक्ष्मी नारायण यांचेही नाव यादीत आहे.

14 पैकी केवळ 6 नोकरीत
यादीमध्ये 14 पोलीस अधिकाऱ्यांची नावे असून त्यापैकी केवळ 6 अधिकारी सध्या नोकरी करत आहेत. यात पी.एन. रासकर, दलबीर सिंह भारती, अजय कुमार बंसल, पी.एन. मगर, अंकित गोयल आणि हिरानी ए. मोहन कुमार यांचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे गृह विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव संजय कुमार यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/