पोटगीचा दावा काढून घेण्यासाठी पत्नी, सासर्‍याकडून 10 लाखाची मागणी, छळाला कंटाळून 36 वर्षीय जावयाची गळफास घेऊन आत्महत्या

सांगोला : पोलीसनामा ऑनलाइन – न्यायालयात दाखल असलेला पोटगीचा दावा मागे घेण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी करत पत्नी, सासू सासरे, मेव्हुणा आणि मामा यांच्या त्रासाला कंटाळून ३६ वर्षीय जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि २) दुपारी नाझरे (सरगरवाडी) घडली. स्वप्नील उत्तम शिरदाळे असे त्याचे नाव आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्याने व्हाट्सअपवरून आपल्या नातेवाइकांना आपल्या मृत्यूस पत्नी आणि तिचे नातेवाईक जबाबदार असल्याचे मेसेज पाठवले आहेत.

सर्गरवाडी येथील शिरदाळे याच्याविरुद्ध पत्नी पूजा हीने मंगळवेढा न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केला आहे. हा दावा काढून घेण्यासाठी सप्टेंबर २०१८ ते ऑक्टॉम्बर २०२० पर्यंत पत्नी पूजा, सासरे मल्लिकार्जुन बुरुकुल, सासू कस्तुराबाई, मेव्हुणा तुकाराम (रा. आंधळगाव ) आणि मामा चंदू पाटील (धर्मगाव ) यांनी संगमात करून स्वप्नीलला नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पोटगीचा दावा मागे घेण्यासाठी १० लाखांची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी तगादा लावला होता अखेर सोमवारी स्वप्नीलने या त्रासाला कंटाळून गट न १२६ मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.