‘मन्या’ सुर्वे माझा ‘भाऊ’, मुंबईला हदरवून सोडणाऱ्या ‘डॉन’बद्दल नाना पाटेकरांकडून खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत आज घेण्यात आली. नाना पाटेकरांनी या मुलाखतीत आपल्या खास शैलीत खासगी आयुष्य, समाजकारण, राजकारण, चित्रपट, सध्याची परिस्थिती या सर्व विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. नानांच्या आयुष्याचे अनेक पैलू या मुलाखतीत उलगडले. त्यामुळे त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

नाना म्हणाले की पिंपरी चिंचवडमध्ये मी बांधकामावर मुकादम होतो. कामगारांचे पगार द्यायचो म्हणून या शहराशी माझे ऋणानुबंध आहेत. येरवड्यात गेल्यानंतर मी 450 खुन्यांशी बोललो, प्रत्येकाने क्षणिक रागातून कृत्य केलं होतं. त्यांच्या आयुष्याचा प्राईम टाईम ते तुरुंगात घालवतात. तो रागाचा क्षण सांभाळला पाहिजे.

मन्या माझा भाऊ –
मन्या सुर्वे हा माझ्या भाऊ होता, असा खुलासा करताना नाना म्हणाले की तो माझ्या मामाचा मुलगा होता. गुन्हेगारी भूमिकेवर बोलताना त्यांनी ही आठवण सांगितली. एकेकाळी मुंबईत मन्या सुर्वेची दहशत होती. त्याच्यावर हिंदी चित्रपट देखील निघाला होता.

नाना पाटेकरांना जाग्या केल्या आठवणी…
‘थोडासा रुमानी हो जाये’ मधील भूमिकेच्या आठवणी सांगताना त्यांनी अमोल पालेकरांची मिमिक्रीही केली. एन. चंद्रा, चंद्रशेखर नार्वेकर हे मराठी नाव स्वीकारायला त्या काळी कोणी तयार नव्हते म्हणून चिडून स्वत:च नामकरण केलं. ह्या माणसांचे मोठं योगदान आहे माझ्या आयुष्यात, अस ते म्हणाले.

पैसे नको देऊ, खांद्यावर हात ठेवा, आकाशातला बाप रुसला म्हणून आमची अशी अवस्था, कर्ज नकोच भीक देताय का, कांद्याचे भाव वाढले म्हणून चिडू नका, तुमच्या महिन्याचे गणित बिघडेल पण त्यांच्या आयुष्यच बिघडलंय, आत्महत्या खूप कमी झाल्या, वैफल्य कमी झालं हे नामचं काम करताना जाणवलं.

एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिका साकारताना आम्ही कलाकार म्हणून समोर येतो. परंतु घरच्यांना वेळ देऊ शकत नाहीत आणि जेव्हा आम्ही घरी परत येतो तेव्हा मुलं मोठी झालेली असतात आणि आमचा नटसम्राट होतो.

शरद पवार माझे हिरो –
शरद पवार माझे हिरो होते, मी त्यांना एकदा सहज म्हणालो होतो की तुम्ही राजकारणातले चाणाक्य आहात, पण एवढ्या वर्षात एकही चंद्रगुप्त तयार केला नाही. परंतु नंतर लक्षात आलं की तेच चाणाक्य आणि चंद्रगुप्तही तेच आहेत. खूप मोठा माणूस, कॅन्सरसारख्या आजाराला परत पाठवलं या माणसाने. खड्डे का बुजवले नाहीत म्हणून ओरडू नका, तुम्ही तुम्हाला दिसणारा खड्डा बुजवा.

स्मिता पाटलांबद्दल बोलताना ते म्हणाले की स्मिता पाटलांमुळे चित्रपट क्षेत्रात आलो, चित्रपट माध्यम मला फार आवडलं नाही. कलाकार त्याच्या अनुभवानुसार अभिनय करत असतो. मी जे भोगलंय ते माझ्या अभिनयात उतरलं.

मला बलात्काऱ्यांचा रोल कधीच करता आला नसता, मला तशी एक भूमिका मिळाली ती मी नाकारली. माफीचा साक्षीदार मधील भूमिका करायला नको होती असं मला वाटतं. मला तशा भूमिकेत जायला आवडत नाही.

फेसबुक पेज लाईक करा –