माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी, उमेदवाराशी संबंध नाही : नाना पाटेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. प्रचारासाठी उमेदवार सभा, बैठकी, दौरे, प्रसिद्ध मंडळींची भेट, भाषण देत प्रचार करत आहेत. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात फोटो आणि मॅसेजचा वापर केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेता नाना पाटेकर याच्या नावाने अनेक मॅसेज व्हायरल होत आहेत. त्यावर खुद्द नाना पाटेकरांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही, असं नानांनी स्पष्ट केले आहे. नानांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या मॅसेजमध्ये त्यांनी अमूक एका पक्षाला किंवा उमेदवाराला समर्थन दिले आहे, अशा आशयाचा मजकूर आहे. मात्र या फोटोंमागील सत्य नानांनी ट्वीट करत सांगितलं आहे. नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, असं स्पष्ट मत नानांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, या पूर्वीही अनेकदा व्हॉटस्अपवर मेसेज व्हायरल होत होते. त्यावरही त्यांनी अनेकदा या मेसेजशी माझा काही संबंध नाही, असं सांगितलं होतं. तसंच नागरिकांनी खोट्या प्रचाराला बळी पडू नये म्हणून नानांनी हे ट्वीट करत लोकांना आवाहन केले आहे.