नागपुरात ठरले : नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे राजकीय पटलाला चांगलेच रंग चढू लागले आहेत. आज काँग्रेसने आपली लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात नागपुरातून नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे गडकरी विरुद्ध पटोले हि लढत महाराष्ट्राच्या राजकरणात सध्या चर्चेचा विषय बनणार आहे.

नाना पटोले यांनी भाजपच्या तिकिटावर गत लोकसभा निवडणूक भंडारा गोंदिया मतदारसंघातून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे मात्तबर नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केले होते. त्यानंतर त्यांची थेट नरेंद्र मोदी यांच्याशी शाब्दिक वादावादी झाल्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करतातच नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या विदर्भातील बड्या भाजप नेत्यांच्या विरोधात टीका करायला सुरु केली. त्याच प्रमाणे नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छा नाना पटोले यांनी स्वतः बोलून दाखवली होती. म्हणून पक्षाने त्यांची इच्छा आज पूर्ण केली आहे.

नाना पटोले यांच्या उमेदवारीला नागपूरच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांचा विरोध होता. मात्र त्यांच्या विरोधाला नजुमानत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाना पटोले यांची उमेदवारी आज जाहीर केली आहे. नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांची उमेदवारी वादळी आणि गाजणारी ठरणार असली तरी गडकरींना पराभूत करणे नाना पटोले यांना कठीण जाणार आहे. किंबहुना ते शक्य देखील होणार नाही असे मत राजकीय जानकरांनी व्यक्त केले आहे.