राज्य काँग्रेसमध्ये ‘खांदेपालट’ ! नाना पटोले ‘प्रदेशाध्यक्ष’ तर पृथ्वीराज चव्हाण विधानसभा ‘अध्यक्ष’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभेचे अध्यपद जाण्याची शक्यता आहे. तर विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकते. महाराष्ट्र काँग्रेसने खांदेपालट करण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र काँग्रेस वर्तुळामध्ये या बदलाची जोरदार चर्चा सुरु झाली असून दोन दिवसांपासून नाना पटोले हे दिल्लीत आलेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागेही हेच कारण असल्याचं समजतंय.

विधानसभा अध्यक्ष निवडीला अजून एक वर्ष पूर्ण झालेलं नसताना हा बदल कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या बदलासाठी काँग्रेसकडून सबळ कारणं सांगितली जात आहेत. त्यामुळे हा बदल लवकरच होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सध्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्याकडे राज्याचे महसूलमंत्री पद आहे. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त केलं जाऊ शकतं.

नाना पटोले हे मूळचे काँग्रेसचे, पण 2014 मध्ये ते भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले. पण भाजपला सोडचिठ्ठी देऊन ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले हे देशातील पहिले खासदार ठरले. नाना पटोले हे आक्रमक स्वभावाचे नेते आहेत. ज्या विदर्भात काँग्रेस भाजपला टक्कर देऊ पहात आहे त्याच विदर्भातील नाना पटोले ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात.

नाना पटोले यांच्याकडे सध्या असलेली जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिली जाऊ शकते. म्हणजेच नाना पटोले यांच्याकडे असलेले विधानसभा अध्यक्षपद चव्हाण यांच्याकडे जाऊ शकतं. परंतु विधानसभा अध्यक्षपद स्वीकारण्यास पृथ्वीराज चव्हाण हे फारसे उत्सुक नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले दोन चव्हाण. एक चव्हाण मंत्रिमंडळात आहेत तर दुसऱ्या चव्हाणांना अद्याप कोणतेच मोठं पद देण्यात आलेलं नाही. पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीच्या समन्वय समितीचं अंध्यपक्ष स्विकारण्यास उत्सुक होते.

पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीच्या समन्वय समितिचं अध्यक्षपद स्वीकारण्यास उत्सुक असले तरी ही समितीच सध्या अस्तित्वात येण्याची शक्यता नाही. पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीच्या राजकारणातील नेते आहेत. पण लोकसभा लढवण्याऐवजी त्यांना विधानसभाच लढवण्यास प्राधान्य दिलं. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे कोणतीच मोठी जबाबदारीच पद नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याची माहिती आहे.