संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाना पटोले संतापले, म्हणाले – ‘ठाकरे सरकार आमच्या टेकूवर आहे, लक्षात ठेवा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   युपीए हा राष्ट्रीय स्तरावरील विषय असून राज्यस्तरावरील, जिल्हास्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुनावले होते. या वक्तव्यावरून राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत उठसूट काँग्रेसविरोधात बोलत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल, राज्यातील ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आले आहे. हे शिवसेनेने चांगले लक्षात घ्यावे, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

नाना पटोले भिवंडीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत शरद पवारांची वकीली करत आहेत, यावरून राऊत शिवसेनेत आहेत की, राष्ट्रवादीत हे तपासावे लागेल असा टोला पटोलेंनी लगावला. लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राऊत यांची तक्रार करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. तसेच राऊतांनी युपीएसाठी शरद पवारांची वकीली बंद करावी असेही पटोले यांनी सुनावले आहे.