‘अमिताभ बच्चन-अक्षय कुमार’ यांना महाराष्ट्रात शुटींग करू देणार नाही, नाना पटोलेंचा थेट इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शुटींग करू देणार नाही असा थेट इशारा दिला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून टिवटिव करणारे अभिनेते आता गप्प का असा सवाल त्यांनी केला आहे.

अभिनेत्यांवर टीका करताना नाना पटोले म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून सारखी टिवटिव करणारे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आता पेट्रोलची दरवाढ दिसत नाही का ? त्यावेळी पेट्रोलची किंमत 60 रुपये असताना हे अभिनेते शंख करत होते. मग आता पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. अशावेळी हे सेलिब्रिटी शांत का. केंद्रात मोदींचं सरकार आहे म्हणून हे चिडीचूप झालेत का ? असे अनेक सवाल त्यांनी केले आहेत.

पुढं बोलताना ते म्हणाले, सर्वसामान्य जनतेची परवड होत आहे. अशात अमिताभ आणि अक्षय यांचं मौन योग्य नाही. त्यांना महाराष्ट्रात शुटींग करण्याचा अधिकार नाही. त्यांचं जिथं कुठे शटुींग सुरू असेल तर बंद पाडण्याची व्यवस्था आम्ही करू असा थेट इशारा पटोलेंनी दिला आहे.

यानतंर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पटोलेंचं हे विधान हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, नाना पटोले हे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षानं अशा पद्धतीचं विधान करणं हास्यास्पद आहे. ते आधी 2009 साली काँग्रेस सरकार कसं शेतकरी विरोधी सरकार आहे अशी बोंब ठोकत होते. नाना पटोले हे सारं काही विसरलेत का असा सवालही त्यांनी केला आहे.