उपचारांअभावी लोक सोडताहेत प्राण पण मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ करण्याची हौस : नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु आहे. त्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ‘लोक वैद्यकीय उपचारांअभावी प्राण सोडत असताना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची मोदींची हौस अजून संपलेली दिसत नाही’, असे ते म्हणाले.

भाजप नेत्यांकडून राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. तर काँग्रेससह इतर पक्षांकडून केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर नाना पटोले यांनी म्हटले, की ‘कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. वर्षभरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना या महामारीच्या काळात सातत्याने केल्या. मात्र, सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती’.

दरम्यान, मोदी सरकारने राहुल गांधींनी वेळोवेळी केलेल्या विधायक सूचनांना गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी जर गांभीर्याने घेतले असते तर आज देशात हजारो चिता जळतानाचे विदारक चित्र पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती. आतातरी मोदी सरकारने झोपेतून जागे व्हावे आणि 130 कोटी जनतेच्या जीविताकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

मोदी-शहांसह अख्खा भाजप निवडणुकांत दंग
देशभरात कोरोना व्हायरस वेगाने वाढत आहे. त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, त्याऐवजी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अख्खा भाजप फक्त पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात दंग आहे. लोक वैद्यकीय उपचाराअभावी प्राण सोडत असताना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची मोदींची हौस अजून संपलेली दिसत नाही, असेही ते म्हणाले.