शेतकर्‍यांचा अपमान मोदींना महागात पडेल’ : नाना पटोले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकर्‍यांचा अपमान मोदींना महागात पडेल असे वक्तव्य अखिल भारतीय किसान काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी आज केले आहे. शेतकर्‍याला दिवसाला 17 रुपये देण्याची घोषणा हा शेतकर्‍यांचा अपमान आहे आणि तो मोदी सरकारला महागात पडेल अशा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. इतकेच नाही तर, शेकडो शेतकरी 17-17 रुपयांचे धनादेश आणि ड्राफ्ट घेऊन पंतप्रधानांच्या कार्यालयात पोहोचले. मात्र शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पंतप्रधानांनी त्यांना वेळ दिली नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले की, “शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांचे ठरलेले हमीभाव न मिळाल्याने ते कर्जाच्या खाईत फसलेले आहेत. मोदी सरकारने या शेतकर्‍यांना मदत तर केली नाहीच; उलट त्यांच्या आवडत्या 15 उद्योगपतींना 3 लाख कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज माफ केले. राफेल कराराचे पैसेही मोदींनी उद्योपतींच्या खिशात टाकले. एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी आत्महत्येत वाढ झाली आहे. सातत्याने शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.”

‘दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार वर्षाला 6 हजार रुपये’ : अर्थमंत्री पीयूष गोयल

आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत अशातच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोदी सरकारनं शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देत खुश केले होतं. देशात जे शेतकरी दुष्काळ व नापिकीच्या समस्येला तोंड देतात अशा शेतकऱ्यांना आता वर्षाला ठराविक रक्कम दिली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल एकूण तब्बल १२ कोटी शेतकऱ्यांना याचा गोष्टीचा लाभ होणार आहे हे विशेष.