‘नानाजी, देवेंद्र फडणवीसजींना सल्ला देण्यापेक्षा…’; केशव उपाध्येंचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचे भयानक संकट आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कोरोना संकटावरून काँग्रेसवर टीका करताना सोनिया गांधी यांनाच पत्र लिहिले होते. त्यानंतर नाना पटोले यांनीही ‘देशाचं रूपांतर स्मशानभूमीत करणाऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस, देवेंद्र फडणवीस यांनी करावे…’, असा टोला लगावत ट्विट केले होते. यावरूनच आता केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.

त्यामध्ये त्यांनी ट्विट करून म्हटले, की ‘नानाजी देवेंद्र फडणवीसजींना सल्ला देण्यापेक्षा कोरोनाचा हाहाःकार असलेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याना काही सांगण्याच धाडस करणार का? काँग्रेस सत्तेत असूनही व दोन्ही पक्ष ढुंकूनही विचारतच नसले तरी जनहितासाठी मुख्यमंत्र्यांना खरी परिस्थिती सांगण्याचे धाडस दाखवाल का?, असे म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. देशात दररोज 4000 रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यातील 850 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. म्हणजेच 22 टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्रात होत असल्याचे दिसत आहे. मात्र, सरकार आपली स्तुती करण्यात व्यस्त असल्याचे म्हटले आहे.