अमजद खानच्या नावाने नाना पटोलेंचा फोन टॅप, धक्कादायक माहिती उघडकीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचं प्रकरण गाजत असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ नाना पटोले यांचा फोन टॅप केला नाही तर त्यांच्या जवळच्या इतर आणखी चार सहकाऱ्यांचे फोनदेखील टॅप करण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे. अमजद खान यांच्या नावाने नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता.

याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. फोन टॅपिंग होत असताना त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. शासनाने याची तातडीने दखल घ्यावी आणि जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर हे होता कामा नये, जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करावी ही आमची भूमिका आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

प्रत्येकाला वैयक्तीक स्वातंत्र्य असतं. कोणीही कोणाच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करु शकत नाही. सरकारच्या परवानगीशिवाय कोणाचेही फोन टॅप केले जाऊ शकत नाहीत. महाराष्ट्राचा गुजरात करण्याचा प्रयत्न केला जात असून माझा फोन टॅप केला गेला. त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं, असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारला आहे.

समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी – मुनगंटीवार

2017 मध्ये नाना पटोले भाजपचे खासदार होते. त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याची अवहेलना होता कामा नये. एका पक्षानं दुसऱ्या पक्षाच्या आणि स्वत:च्याही पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करु नयेत. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून चौकशी करण्यात यावी. मी नानांच्या सोबत आहे. अशा प्रकारे कोणाचेही फोन टॅप केले जाऊ नयेत, असं भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.