नाणार : भाजपच्या ‘या’ नेत्यानं केला ठाकरे बंधूंवर ‘गंभीर’ आरोप !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाणार प्रकल्पाला शिवसेनेकडून जोरदार विरोध होत आहे. खासदार विनायक राऊत यांनी तर समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांना झोडून काढण्याचा इशारा जाहीर सभेत दिला होता. मात्र, राजापूरमधील आजच्या समर्थनाच्या सभेमध्ये शिवसैनिक टोप्या आणि गमछे घालून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. याचवेळी भाजपचे माजी आमदार सिंधुदूर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ठाकरे घराण्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रमोद जठार यांनी नाणारवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या टीकेचा रोख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडेही होता

नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येथे येऊन सांगून गेले असले तरी प्रत्यक्षात सत्य वेगळंच आहे. नाणार प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी ठाकरे बंधूंच्या नातेवाईकांनी खरेदी केल्या आहेत, असा थेट आरोप करतानाच हवे असल्यास याबाबतचे पुरावे द्यायलाही मी तयार आहे, असे जठार यांनी सांगितले. रिफायनरीच्या समर्थनार्थ डोंगर तीठा येथे मेळावा तसेच सत्यनारायणाची पूजाही आयोजित करण्यात आली होती. या मेळाव्यात बोलताना प्रमोद जठार यांनी नाणारला विरोध करणाऱ्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.

खासदार विनायक राऊतांचा इशारा
नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली होती. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांची हाकालपट्टी केल्याचेही सांगितले. यावेळी शिवसेनेचा गमछा किंवा झेंडा घेऊन कोणी शिवसैनिक रिफायनरीला पाठिंबा देईल त्याची गय केली जाणार नाही, हा त्यांनी इशारा समजावा. यापुढे जो शिवसैनिक रिफायनरीचे समर्थक करेल त्याला झोडून काढावे, असेही त्यांनी सांगितले होते.