५०,००० लाच घेतल्या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदाराविरुद्ध आलेल्या तक्रारीवर कारवाई करु नये, यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचून दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले.

पोलीस निरीक्षक दिलीप विश्वनाथ तिडके (वय ५२, रा. किनवट), पोलीस कर्मचारी मधुकर व्यंकटराव पांचाळ (वय ४३, रा. पोलीस कॉलनी, स्रेहनगर, नांदेड) आणि पांडुरंग बाबुराव बोईनवाड (वय ३२, रा. शिवाजी चौक, किनवट) अशी त्यांची नावे आहेत.

तक्रारदाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आला होता. त्यावर कार्यवाही न करण्यासाठी पोलीस निरीक्षक तिडके व कर्मचारी पांचाळ यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. याची तक्रार आल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पडताळणी केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदार यांच्या किनवटमधील घराचे परिसरात सापळा लावला.

पोलीस कर्मचारी पांचाळ याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपये घेऊन ते पैसे पोलीस कर्मचारी बोईनवाड यांच्याकडे ठेवायला दिल्यावर दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, पोलीस निरीक्षकाचा देखील यामध्ये सहभाग असल्याने निरीक्षक तिडके यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ही सापळा कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय लाटकर, अपर पोलीस अधीक्षक पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्हि. एल. पेडगावकर, पोलीस नाईक एकनाथ गंगातिर्थ, गणेश तालकोकुलवार, अंकुश गाडेकर, अनिल कदम यांनी केली. या घटनेमुळे नांदेड पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक तिडके आणि इतर २ पोलीस कर्मचारी किनवट पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

आरोग्य विषयक वृत्त – 

‘यकृत’ निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स

महिलांनो, नॅचरल ग्लो हवाय? मग अवश्य करा ‘हे’ उपाय

गरोदर महिलांनी खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्य वाढ

सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय