30 हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह सरपंच महिलेचा पती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल पंपासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ३० हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाने ग्रामसेवक आणि सरपंच महिलेच्या पतीला अटक केली आहे. ग्रामसेवकासह सरपंच महिलेचा पती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ग्रामसेवक विकास भारती आणि सरपंच महिलेचा पती वागतकर यांच्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदारास पेट्रोल पंपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र लागणार होते. त्यासाठी त्यांच्याकडे ग्रामसेवक विकास भारती आणि वागतकर यांनी ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीची ९ ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लाचेची मागणी होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी भोकर पंचायत समितीच्या आवारात सापळा रचण्यात आला.

सरकारी पंचासमक्ष ३० हजार रूपयाची लाच घेतल्यानंतर दोघांवर कारवाई करण्यात आली. अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे वरिष्ठ अधिकारी विजय डोंगरे, उप अधीक्षक संपते, निरीक्षक बी.व्ही. गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी एकनाथ गंगातीर्थ, दर्शन यादव, सचिन गायकवाड, अंकुश गाडेकर आणि अनिल कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –