3300 रुपयाची लाच घेताना वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकाऱ्यासह सेवक अँटी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – दलित वस्तीत केलेल्या कामाच्या धनादेशावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची सही घेऊन धनादेश देण्यासाठी 3300 रुपयाची लाच घेताना नांदेड जिल्हा परिषदमधील वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकारी व सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अधिकारी मधुकर बालाजी मोरे (वय 48 रा. सोनखेड, जि. नांदेड) आणि सेवक अनंत काशिनाथ जानापुरे (वय -35 रा. जनार्दन नगर नांदेड) असे रंगेहाथ पडकण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

तक्रारदार यांनी सिसिरोड परिसरातील दलित वस्तीत दुरुस्तीची कामे केले होती. या कामाच्या धनादेशावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची सही घेऊन धनादेश तक्रारदाराला देण्यासाठी सहाय्यक लेखाधिकारी मोरे यांने सेवक अनंत जानापुरे यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले होते. तक्रारदार यांनी मंगळवारी (दि.9) नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीवरून पडताळणी केली असता मोरे याने सेवक जानापुरे यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

नांदेड लाचलुपच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हा परिषदेतील वित्त विभागात सापळा रचून सेवक अनंत जनापुरे याला सहाय्यक लेखाधिकारी मोरे याच्या सांगण्यावरून 3300 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी मधुकर मोरे आणि अनंत जानापुरे या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शेट्टी, पोलीस नाईक दर्शन यादव, एकनाथ गंगातिर्थ, नरेंद्र बोडके यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.