अवैध वाळू उपसा संदर्भात नांदेड प्रशासनानं कसली कंबर !

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध आणि बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा होत असल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. जिल्ह्यात 202 वाळू घाट असले तरीही यंदाच्या वर्षी पडलेल्या दमदार पावसामुळं अनेक वाळू घाट पाण्याखाली गेले आहेत. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात 39 वाळू घाट लिलावास पात्र आहेत. मात्र अद्याप पर्यावरण विभागाची त्यास मान्यता मिळाली नसल्यानं प्रतिक्षेत आहेत.

कोरोनाच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा प्रतिबंधात्मक उपाययोजनेत गेल्या 6 महिन्यापासून व्यस्त आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यापासून ते अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असल्यानं त्याचा गैरफायदा काही वाळू माफियांनी घेतला. त्यामुळं वाळू घाटावर अवैध आणि बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा सुरू होता. वाळू माफियांची ही लूट सुरू असल्यामुळं त्या तक्रारींची दखल जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी घेतली आणि उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली.

कडक कारवाईच्या सूचना
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्यासह जलसंपदा पोलीस आणि संबंधित विभागाची बैठक घेतली. वाळू घाटावर अवैधरित्या उपसा होऊ नये यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली. तसंच तालुकानिहाय पथकांची स्थापना करून कारवाईस सुरुवात केली. सुरुवातीला वाळू उपसा करणाऱ्या बोटी उध्वस्त करण्यात आल्या. त्यानंतर नदीतील तराफे जप्त करण्यात आले. काही ठिकाणी थर्मोकॉलचे तराफेही जप्त करून जाळण्यात आले. सोबतच नांदेड तालुक्यात तहसिलदार किरण अंबेकर यांच्या प्रस्तावानुसार नांदेडचे उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांनी गोदावरी आणि आसना नदीच्या काठावर 144 कलम लागू केलं आहे. आता वाळूच्या ट्रकची देखील भरारी पथकांद्वारे अचाकन तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे.