नांदेडमधील उपजिल्हा रूग्णालयात ‘राडा’, कोविड वॉर्डामध्ये डॉक्टरवर थेट चाकूहल्ला

नांदेड: पोलीसनामा ऑनलाइन – कोविड वार्डात मोठ्याने बोलू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांने चक्क डॉक्टरावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

भाऊसाहेब गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात कोरोनाचा थैमान सुरु आहे. अशा संकटकाळात डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी हे जीवाची पर्वा न करता, रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. असे असतनाही त्यांच्यावर हल्ले होत आहेत. मुंबईतील नर्सवरील चाकूहल्ल्याची घटना ताजी असतानाच मुखेड उपजिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डात रुग्णाच्या नातेवाइकाने चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. कोविड वॉर्डात मोठ्याने बोलू नका, असे सांगितल्यावर रुग्णाच्या नातेवाइकाला राग आला. तो रागाच्या भरात हातात चाकू घेऊन डॉक्टरांच्या अंगावर धावून गेला. पण वॉर्डातील इतर लोकांनी आरोपीला पकडून हातातून चाकू काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.