नांदेडमध्ये भररस्त्यात आढळला राजकीय कार्यकर्त्याचा जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेडमध्ये आज (शनिवार) भररस्त्यामध्ये एका राजकीय कार्यकर्त्याचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दयानंद वंजे असे या कार्यकर्त्याचे नाव असून वंजे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन तपास सरु केला आहे. वंजे यांच्या मृत्यूप्रकरणी मोठे षडयंत्र असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे. मयत वंजे यांची सर्वच पक्षातील राजकीय व्यक्तींसोबत उठबस होती. यातूनच त्यांनी मोठ्या आर्थिक उलाढाल केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे हे अद्याप समजू शकले नाही.

या प्रकरणात पोलिसांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. तसेच तपासानंतर सर्व माहिती दिली जाईल असे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे वंजे यांच्या मृत्यूचे गुढ आणखीनच वाढले असून शहरामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, एका वजनदार राजकीय कार्यकर्त्याचा भररस्त्यात जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कायदा-व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे वंजे यांच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.