Nanded News : उद्या 550 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस : जिल्हाधिकारी डॉ. विपीन

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे शनिवारी (दि. 16) देशभरात कोरोना लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील 5 केंद्रावर पहिल्या दिवशी जवळपास 550 लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी (दि. 15) परिषदेत सांगितले.

यावेळी डॉ. विपीन म्हणाले की, पहिल्या दिवशी जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय, हैदरबाग येथील महापालिकेचे रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय हदगाव, मुदखेड तालुक्यातील मुगट उप जिल्हा रुग्णालय या पाच केंद्रावर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आदीं उपस्थित होते.

लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन
लस देण्यासाठी सेंटरच्या ठिकाणी वेटींग रुम, व्हॅक्सीन रुम आणि निरिक्षण कक्ष तयार केले आहेत. लस देण्यापूर्वी लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन करुन नंतर त्यांना लस देण्यासाठी पुढे सोडले जाईल. लस दिल्यानंतर त्या लाभार्थ्यास कुठला ही साईड इफेक्ट होतो का? यासाठी त्यांना अर्धा तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. त्यानंतर दुसरा डोस कधी दिला जाणार याबद्दलची माहिती देऊन त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सहा खासगी रुग्णालये सज्ज
लस दिल्यानंतर रुग्णास गंभीर परिस्थिती उद्भवल्यास सहा खासगी रुग्णालयात तत्काळ उपचार सेवा दिली जाणार आहे. त्यामध्ये नारायणा मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल (जयभीम नगर), लोटस हॉस्पीटल (डॉक्टर लेन), अश्‍विनी हॉस्पीटल (डॉक्टर लेन), लाईफ केअर हॉस्पीटल (दत्तनगर आण्णा भाऊ साठे चौक), तिरुमला हॉस्पीटल (काबरानगर), रेणुकाई हॉस्पीटल (महाराणा प्रताप चौक).