नांदेड : …म्हणून अधिकाऱ्याने ऑफिसला चक्क घोड्यावरून येण्याची मागितली परवानगी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेडमध्ये एक वेगळाच अर्ज जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याकडे आला. हा अर्ज कोणा एका नागरिकाचा नव्हता तर एका सरकारी अधिकाऱ्याकडून हा आगळावेगळा अर्ज मिळाला आहे. या अधिकाऱ्याने अर्जात लिहिले, की त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रोज घोडा बांधण्याची परवानगी द्यावी. या अधिकाऱ्याने सांगितले की तो दररोज घोड्यावरून येणार आहे. त्याचे कारणही त्याने पत्रात दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात अधिकाऱ्याने म्हटले, की माझ्या मणक्याला त्रास होत आहे. त्यामुळे मला दुचाकी वाहन चालवता येत नाही. म्हणून मला दररोज घोड्यावरून कार्यालयात येण्याची परवानगी द्यावी. तसेच कार्यालय परिसरात घोडा बांधण्यासाठी परवानगी द्यावी. मात्र, या अर्जाच्या निकालापूर्वी संबंधित अधिकाऱ्याने अर्ज मागे घेतला आहे. या अर्जाची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने डॉक्टरांकडे याचा सल्ला मागितला तर त्यांनी घोड्यावरून रोज येण्या-जाण्यास मणक्याला जास्त त्रास होईल, असे सांगितले.

अधिकाऱ्याने अर्ज घेतला मागे
दरम्यान, जिल्हाधिकारी इटनकर यांनी याप्रकरणाची विचारणा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने त्याचा अर्ज मागे घेतला होता. अर्ज मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आर्थोपेडिक्स डॉक्टरांकडे सल्ला मागितला होता. त्यावर डॉक्टरांनी सांगितले, की घोड्याने दररोज ये-जा केल्याने झटका बसू शकतो. त्यामुळे मणक्याची समस्या आणखी उद्भवू शकते.