8000 रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 8 हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवकाला नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) नांदेड जिल्ह्यातील बळीरामपुर ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. गोविंद गुनाजी माचनवाड (वय-40 रा. सुनिल नगर, बळीरामपुर, नांदेड) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

याप्रकरणी 22 वर्षीय तक्रारदाराने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 7 ऑगस्ट रोजी तक्रार केली. तक्रारादर यांना बळीरामपुर गावात वॉटर प्लांट टाकायचा आहे. यासाठी त्यांनी ग्रामपचायत कार्यालयाकडे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. तक्रादार यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक गोविंद माचनवाड याने 8 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची पडताळणी केली असता माचनवाड याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. माचनवाड याला तक्रारदार यांच्याकडून आठ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पडकण्यात आले. गोविंद माचनवाड याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस नाईक हणमंत बोरकर, किशन चिंतोरे, एकनाथ गंगातिर्थ, अनिल कदम, नरेंद्र बोडके यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.