नांदेडच्या गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहीबची मोठी घोषणा ! 50 वर्षात जमलेले सोने आरोग्य सेवा उभारण्यासाठी दान करणार

नांदेडः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटात लोकांच्या मदतीसाठी देशभरातील अनेक गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या पुढे येत आहेत. अशातच नांदेड येथील गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहीबने गेल्या 50 वर्षात जेवढे सोने जमले आहे, ते सर्व मेडिकल इंफ्रास्ट्रक्चरसाठी दान करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.या सोन्यातून रुग्णालयांपासून ते आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्याची पूर्तता केली जाणार आहे. गुरुद्वाराच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. त्यावेळीही अनेक गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या समोर आल्या आणि त्यांनी मोफत ऑक्सिजनची व्यवस्था केली होती.

देशभरातील अनेक गुरुद्वारा व्यवस्थापन समित्यां कोरोना काळात खाण्यापासून ते बेड आणि ऑक्सिजनपर्यंतची व्यवस्था करत आहेत. एक दिवसापूर्वीच शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने रूपनगरमधील गुरुद्वारा श्री भट्ठ साहीबच्या हॉलमध्ये कोविड सेंटर सुरु केले. या सेंटरचे लोकार्पण अकाली दल प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रमुख जगीर कौर यांनी केले. यापूर्वी, दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने लॉकडाउन आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत गुरुद्वारा बंगला साहीबच्या वतीने लंगर सेवा सुरू केली आहे. कोरोना पीडित कुटुंब, जे स्वतः भोजन बनवू शकत नाहीत, खाण्याची व्यवस्थाही करू शकत नाही. त्यांच्या घरापर्यंत लंगरचे टिफीन पोहोचवले जात आहे. यासंदर्भात दिल्ली गुरुद्वारा समितीने हेल्पलाइन नंबरही सुरु केला आहे. ज्या कुटुंबांना आपल्या घरी लंगर हवे आहे, ते या फोन नंबरच्या माध्यमातून दिल्ली गुरुद्वारा समितीशी संपर्क साधावा. त्यांना समितीमार्फ घरापर्यंत लंगर पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल.