खलिस्तानवादी अतिरेकी म्हणून पकडलेल्या पंजाबी युवकाची निर्दोष मुक्तता

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – खलिस्तानवादी दहशतवादी असल्याच्या संशयातून आठ दिवसांपूर्वी नांदेडमध्ये पकडलेल्या पंजाबी युवकाला निर्दोष मुक्त केले आहे. पंजाब पोलिसांनी कोर्टात रिपोर्ट दाखल करून त्याला सोडून दिले आहे.

गुरपिंदरसिंग संतासिंग उर्फ ग्यानी (वय 33, रा. गुरुसर, जिल्हा मुक्तसर, पंजाब) असे या युवकाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, 7 फेब्रुवारी रोजी नांदेडमधील शिकारघाट परिसरात पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदरसिंग संतासिंग यास खलिस्तानी दहशतवादी असल्याच्या संशयातून अटक केली होती. खलिस्तान जिंदाबाद संघटनेच्या चार दाहशतवाद्या विरोधात पंजाबमध्ये बंदी आदेश लागू केला आहे. त्यातील एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याने पंजाब पोलिसांना गुरपिंदरसिंग संतासिंग हा आमचा साथीदार असल्याची माहिती दिली.

त्यानुसार पंजाब पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा नांदेड यांनी संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदर सिंग याला नांदेडमधून अटक करून प्रवासी रिमांडवर घेऊन पंजाबला रवाना केले होते. परंतु, पंजाब पोलिसांच्या तपासात तो दोषी न आढळल्यामुळे पंजाब पोलिसांनी स्वतः कोर्टात रिपोर्ट दाखल करून त्याची निर्दोष मुक्तता केली. नांदेड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पंजाब येथील आयओ जसविंदर सिंग यांनी दिली.