नांदेड : आरटीओ (RTO) अधिकाऱ्याला राजकीय कार्यकर्त्यांची मारहाण

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेडमध्ये एका आरटीओ अधिकाऱ्याला राजकीय कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाण करणारे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्यात येते, तरी देखील अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

शनिवारी दुपारी नांदेड आरटीओ कार्य़ालयात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोटर वाहन निरीक्षक डोंगरे यांना मारहाण केली. डोंगरे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी काही अपशब्द काढले असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्ते याचा जाब विचारण्यासाठी डोंगरे यांच्या कार्यालयात आले होते. त्यावळी डोंगरे यांनी त्यांची माफी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, संतप्त कार्यकर्त्यांपैकी एकाने डोंगरे यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांनी देखील डोंगरे यांना मारहाण केली. या घटनेमुळे आरटीओ कार्यालयात खळबळ उडाली होती.

विशेष म्हणजे ज्यावेळी डोंगरे यांना मारहाण करण्यात आली त्यावेळी त्यांच्या अंगावर सरकारी गणेवेश होता. गणवेश असताना देखील शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला ज्यावेळी मारहाण केली जाते किंवा त्याच्या कार्यालयात गोंधळ घातला जातो त्यावेळी संबंधीत व्यक्ती विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, या प्रकरणात डोंगरे यांनी अद्याप कोणतीही तक्रार केली नसल्याने आश्चर्य़ व्यक्त करण्यात येत आहे.