5 वर्षीय मुलीवर बलात्कार ! न्यायालयानं अवघ्या 64 दिवसात आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  5 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला भोकर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. नांदेड जिल्ह्यात ही घटना घडली होती. घटना घडल्याच्या अवघ्या 64 दिवसात न्यायालयानं हा निकाल दिला आहे.

दिवशी (ता. भोकर, जि. नांदेड) या गावातील ही घटना आहे. 20 जानेवारी रोजी ही संतापजनक घटना घडली होती. बाबू संगेराव (वय 35) असं आरोपीचं नाव आहे. मृत मुलीच्या शेतात तो सालगडी म्हणून होता.

नेमकं काय घडलं ?

घटना घडली त्या दिवशी दुपारी 4 वाजताच्या सुमारास आरोपीनं मुलीला घरी नेण्याचा बहाणा केला आणि तिला शेतातून घेऊन गेला. परंतु घरी न जाता तो शेताच्या शेजारीच असणाऱ्या झुडपात त्या मुलीला घेऊन गेला. तिथंच तिच्यावर अत्याचार करून त्यानं तिचा निर्घृण खून केला.

पुढं काय झालं ?

या घटनेनंतर मुलगी गायब असल्यानं तिची शोधाशोध सुरू झाली. तिच्या कुटुंबीयांनी रात्री त्या मुलीचा मृतदेह सापडला. गावकऱ्यांना आरोपी देखील नग्न अवस्थेत सापडला. त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. यानंतर पोलीस गावात दाखल झाले आणि त्यांनी गावकऱ्यांच्या तावडीतून आरोपीला सोडवत आपल्या ताब्यात घेतलं. पोलिसांनी 19 दिवसात याचा तपास करून न्यायालया दोषारोपपत्र दाखल केलं.

न्यायालयानं 40 दिवसात सुनावणी पूर्ण करून आरोपीला दिली फाशीची शिक्षा

यानंतर खटला सुरू झाल्यानंतर न्यायालयानं 40 दिवसात सुनावणी पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयानं या खटल्यात 15 साक्षीदार तपासले. मृत मुलीच्या अंगावर तब्बल 47 जखमा होत्या. आरोपीनं अत्यंत निर्घृणपणे तिचे लचके तोडले होते. ही घटना दुर्मिळ असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं आणि आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. अशा प्रकारे घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीला लवकर शिक्षा मिळाली म्हणून शहरातील नागरिकांनाही समाधान वाटलं.