दोन्ही पाटलांनी पहाटेपासूनच ठोकला होता कोरेगाव भीमा मध्ये तळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा येथे मागील वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो लोक आज येथे दाखल झाले आहेत. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह त्यांची टीम पहाटेपासून ड्युटीवर हजर आहे.

मागील वर्षी झालेल्या दंगलीनंतर नांगरे पाटलांनी नागरिक आणि अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांना शांत राहण्याचे आवहान केले होते. संतप्त झालेला जमाव नांगरे पाटील यांच्या आवाहानानंतर शांत झाला होता. याचा प्रत्यक्ष अनुभव सणसवाडी येथे सर्वांना आला होता. नांगरे पाटील यांनी यापूर्वी पुणे एसपी पदाची धुरा सांभाळल्यामुळे त्या अनुभवाचा उपयोग या ठिकाणी झाला.

गेल्या वर्षीचा प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी पुरेशी दक्षता घेतली आहे. तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त पेरणे फाटा परिसरात लावण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिस येथे तळ ठोकून आहेत. राज्याच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सतत अपडेट दिले जात आहेत. तसेच पुण्यातही पोलिस टिम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

खासगी वाहनांना विजयस्तंभाजवळ येण्यास मनाई करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी निर्धास्तपणे यावे, असे आवाहन नांगरे पाटील यांनी केले. स्थानिक नागरिकांनीही येणाऱ्या गर्दीचे उत्साहात स्वागत केले.