विश्वास नांगरे पाटलांची ‘कडक’ कारवाई ; २ लाखांसाठी व्यावसायिकाला बेदम मारहाण करणाऱ्या ‘त्या’ सहायक पोलिस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वादग्रस्त ठरलेल्या पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांना व्यावसायिकाचे अपहरण करुन दोन लाखांची खंडणी मागितल्याचा ठपका ठेवून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निलंबित केले आहे. गिरमे यांच्यावर कारवाई करुन विश्वास नांगरे पाटील यांनी ‘खाकी’वर डाग लावणाऱ्यांची गय करणार नाही, असा इशाराच सर्वांना दिला आहे.

दीपक गिरमे हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. मात्र, आजवर वरिष्ठांची मर्जी असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. विश्वास नांगरे पाटील यांनी पंचवटी पोलीस ठाण्याला पहिल्यांदा भेट दिली, तेव्हाच गिरमे यांचा कारभार त्यांच्यापुढे उघड झाला होता. किरकोळ मारहाणीच्या घटनेत त्यांनी चक्क प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा डायरीवर नोंदविल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

काही दिवसांपूर्वी टकलेनगरमधील व्यावसायिक मयूर वसंत सोनवणे (वय ३३) यांच्या घरी मध्यरात्री साडेबारा वाजता दीपक गिरमे, शिपाई सागर पांढरे हे खासगी मोटारीने गेले. त्यांनी मयूर यांना ताब्यात घेऊन त्यांना आडगाव येथील कारखान्यात नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील ६० हजार रुपये काढून घेतले. मयूर सोनवणे यांनी दुसऱ्या दिवशी आडगाव पोलिसांकडे याची तक्रार केली. पण त्यांनी गुन्हा दाखल करुन न घेता चक्क त्यांच्यावरच दबाव टाकून त्यांचा जबाब बदलण्यास भाग पाडले व त्यावर त्यांची बनावट सही करुन बनावट पुरावा तयार केला. त्यानंतर सोनवणे यांनी गिरमे यांच्याविषयीची तक्रार थेट विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन केली. सोनवणे यांच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश नांगरे पाटील यांनी पोलीस उपायुक्तांना दिले. गिरमे यांचे कारनामे माहिती असल्याने नांगरे पाटील यांनी त्यांची तातडीने पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली.
पोलीस उपायुक्तांनी आठवड्याभरात चौकशी करुन आर्थिक फायद्यासाठी गिरमे यांनी सोनवणे यांना मारहाण करुन त्यांच्याकडील पैसे लुबाडल्याचा ठपका आपल्या अहवालात ठेवला. हा अहवाल मिळताच नांगरे पाटील यांनी गिरमे यांना निलंबित केले आहे.

गुन्हे शाखेतून पंचवटी पोलीस ठाण्यात आलेल्या गिरमे विषयी अनेक तक्रारी यापूर्वी आल्या होत्या. कधी महाविद्यालयीन युवकांना तुमचे करियर उद्वस्त करुन टाकण्याची धमकी देणे, रात्रपाळीत लोकांना अडवून पैशाची मागणी करणे अशा अनेक तक्रारी त्यांच्याविषयी केल्या गेल्या होत्या. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी एका संशयिताला पकडण्यासाठी बिहारला पाठविले होते. मात्र, त्याला पकडून आणताना आरोपी रेल्वेतून गिरमे याच्या तावडीतून पळून गेला होता. महिलेवरील अत्याचाराची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी तिला पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला होता.