ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नॅनो होस्टेलचा प्रस्ताव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी राहण्याची सोय होण्याकरिता नॅनो होस्टेलचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन व ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलनाच्यावतीने मांडण्यात आला आहे. माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

शहरात महाविद्यालय व शासकिय होस्टेलची संख्या कमी असल्याने मर्यादित विद्यार्थ्यांनाच तेथे प्रवेश मिळतो. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होस्टेलला प्रवेश न मिळाल्याने त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो. राज्यातील मोठी व मध्यम शहरात खाजगी इमारती मोठ्या प्रमाणात पडून आहे. भाडेकरु संरक्षण कायद्यामुळे मालक ती जागा भाड्याने देत नाही. शासनाने नॅनो होस्टेलला मान्यता देऊन विद्यार्थी व जागा मालकांना संरक्षण देणारी नियमावली लागू करुन दिल्यास कोणताही खर्च न करता मोठ्या प्रमाणात नॅनो होस्टेलची निर्मिती होणार असल्याची संकल्पना संघटनेच्या वतीने प्रस्तावात मांडण्यात आली आहे.

नॅनो होस्टेलने इमारतीच्या मालकांना प्रोत्साहन मिळून विद्यार्थ्यांना संरक्षण मिळणार आहे. प्रत्येक नॅनो होस्टेलमध्ये 30 ते 40 मुले व मुलींसाठी स्वतंत्र्य व्यवस्था राहणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण करुन त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत. ही संकल्पना रुजल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राहण्याची सोय होऊन रिकाम्या इमारतींचा योग्य वापर होणार आहे. आर्थिक दुबळ्या घटकांसाठी ही योजना फायद्याची ठरणार असून, लाभार्थी विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार जागा मालकाच्या खात्यावर वर्ग करणार आहेत. शहरात नॅनो होस्टेल उभारण्यासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम, अ‍ॅड.स्नेहल गायकवाड, अ‍ॅड.अस्मिता उदावंत, प्रा.सुदाम देवखिळे, नानासाहेब लांडे आदी प्रयत्नशील आहे.

आरोग्यविषयक वृत्त –