Narada Sting Operation : तृणमूल काँग्रेसच्या ‘त्या’ चारही नेत्यांना नजरकैदेत राहण्याचे आदेश; उच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – नारदा स्टिंग ऑपरेशनमध्ये अटक झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या चारही नेत्यांना नजरकैदेत राहण्याचे आदेश दिले आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती अरजित बॅनर्जी यांच्या पीठात सुनावणी झाली.

न्यायमूर्ती अरजित बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेस नेते सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा, फिरहाद हाकिम आणि पक्षाचे माजी नेते शोभन चॅटर्जी यांना जामीन देण्यासाठी सहमत होते. मात्र, कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल हे जामिनाविरोधात होते. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी उच्च पीठ करणार आहे. तोपर्यंत तृणमूल काँग्रेसच्या या चारही नेत्यांना नजरकैदेत राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, यापूर्वी सोमवारी रात्री जामीन देण्यास नकार दिला होता. या चारही नेत्यांना सीबीआयने नारद स्टिंग प्रकरणात सोमवारी अटक केली होती. त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. खंडपीठाने बुधवारी सुनावणी एका दिवसासाठी स्थगित केली होती.

काय आहे प्रकरण?

नारदा टीव्ही न्यूज चॅनेलच्या मॅथ्यू सॅम्यूअलने 2014 मध्ये कथितरित्या स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे मंत्री, खासदार आणि आमदार संबंधिताला फायदा पोहोचवण्याच्या मोबदल्यात पैसे घेताना दिसले होते. ही टेप 2016 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सार्वजनिक झाली होती.