खंडणी प्रकरणातील नारायण पवारांनी दिला भाजप गटनेतेपदाचा राजीनामा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – तीन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेले भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी अखेर ठाणे महापालिकेतील गटनेतेपद सोडले आहे. पवार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांच्यावतीनेच देण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात कासारवडवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर यापुढील काळामध्ये भाजपचा नगरसेवक आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन, असे नारायण पवार यांनी स्पष्ट केले. तीन कोटी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण पवार हे 10 फेब्रुवारी रोजी पोलिसांसमोर शरण आले होते. त्याचवेळी कासारवडवली पोलिसांनी त्यांना खंडणी प्रकरणात अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

ठाणे महापालिका भाजप गटनेतेपदाचा राजीनामा देताना पवार यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शहराचा नियोजबद्ध विकास व महापालिकेतील विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असताना माझ्या विरोधात 2008 मध्ये दाखल झालेल्या खंडणीच्या खोट्या तक्रारीचे प्रकरण उकरुन काढण्यात आले. माझ्या राजकीय कारकीर्दीत अडथळा आणण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण ?
तीन कोटीच्या खंडणी प्रकरणात नारायण पवार यांच्यासह चार जणांवर गुन्हा दखल आहे. आरोपींनी संगनमत करून जमिनींची कागदपत्रं तयार केली. त्या आधारे ठाणे महापालिकेत अर्ज करून बिल्डरकडे तीन कोटींची खंडणी मागितली असा आरोप पवार यांच्यावर आहे. नारायण पवार यांनी तीन लाख रुपये स्विकारले आणि उर्वरित रकमेसाठी तगादा लावला, त्रास दिला असा आरोप तक्रारदाराने केला. या प्रकरणात अटक होऊ नये यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. तसेच ठाणे न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर ते फरार झाले होते.