शरद पवारांचा नारायण राणे आणि चंद्रकांत पाटलांना टोला, म्हणाले – ‘आता तरी त्यांना चांगली झोप येईल’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – ज्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, तो राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे घेतलेला निर्णय होता. असे असताना केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविणे चुकीचेच आहे. हा राज्य सरकारच्या अधिकारात केलेला हस्तक्षेप आहे. त्या संबंधित नेत्यांनी त्याची मागणी केली असेल. आता सुरक्षा व्यवस्था मिळाल्याने त्या नेत्यांना (माजी मुख्यमंत्री नारायण राणे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील) चांगली झोप लागेल, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. 22) येथे लगावला.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचा अनावरण पवार यांच्या हस्ते होत आहे. त्यासाठी ते आज कोल्हापूरात आले आहेत. सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, ए.वाय.पाटील हे उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्य सरकारने पूर्ण विचाराअंती ज्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवणे हे गंमतीशीर आहे. मलाही त्याचे आश्चर्य वाटले. काही लोकांना उगीच पोलिसांचा जथ्था सोबत घेवून फिरायची भारी हौस असते असेही ते म्हणाले.